एक जोडपं... 30 देश... 67 ठिकाणं... 67 लग्नं
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgt_frLBR-3ZaSr0OcSdzPIV7CmAf6Us_LNHu7th5W76pOgImGvyN-pmuVzp21nmMVRH60hebsglklATQzRU9NK3Lx9qBrZEih3erC1mym9duzTr4nVWcXwQjlt36oUeFCf2h1UWtZZUKY9/s1600/17.+Costa+Rica+-+Kevin+Heslin+kevinheslinphoto.com.jpg) |
Costa Rica- kevinheslinphoto.com |
लग्न आयुष्यात एकदाच होतं. मग ते संस्मरणीय का नसाव? साधारण सगळ्याच लग्नेच्छुक जोडप्यांना असं वाटतंच. इंग्लंडमधील यॉर्कशायर काऊंटीत राहणार्या लिसा गँट आणि एलेक्स पेलिंग या जोडप्याच्या डोक्यातही असंच काहीतरी आलं. त्यातनं समोर आली ती एक भन्नाट कल्पना... जोपर्यंत आपल्याला लग्नासाठी आपल्या आवडीनुसार ठिकाण सापडत नाही तोपर्यंत प्रत्येक ठिकाण आणि तिथली लग्नपद्धती ट्राय करायची. गेली साडे तीन वर्षे हे जोडपं आपल्या लग्नासाठी परफेक्ट डेस्टिनेशन शोधतंय. त्यासाठी त्यांनी पालथी घातलीत जवळपास 30 देशांमधील 67 ठिकाणं आणि या जोडप्यानं केलीत 67 लग्न.
लिसा व्यवसायानं रिटेल मॅनेजर तर एलेक्सचा कार बॉडी रिपेअरिंगचा बिझनेस. दोघांची 14 वर्षांपासूनची मैत्री. सहा वर्षांपूर्वी एलेक्स नि लिसानं एकमेकांना प्रेमाची कबूली देत लग्न करण्याचं ठरवलं. पण लग्न कुठे आणि कसं करायचं? डोक्यात एक कीडा घुसला नि दोघांनी आपला कामधंदा सोडला. त्यांनी आपल्या भन्नाट कल्पना प्रत्यक्षात उतरवली ती जून 2011 पासून. मँचेस्टरमधील डिड्सबरी येथे 6 जून रोजी त्यांनी तिथल्या पारंपारिक पद्धतीनं लग्न केलं. त्यानंतर कॅनडा, मिशिगन, हवाई, मेक्सिको, कोलंबिया, पेरू, अर्जेंटिना, दक्षिण आफ्रिका, फ्रान्स, हंगेरी, स्वित्झर्लंड, न्यूझीलंड...
या दोघांनी आपल्या आतापर्यंतच्या लग्नांची अथ पासून इतिपर्यंत माहिती देणारा एक ब्लॉगही सुरू केला. आपल्यासारखाच विचार करणार्या (समविचारी) जोडप्यांना मार्गदर्शन करण्याचं कामही ही दोघं या ब्लॉगच्या माध्यमातून करतात. एलेक्स म्हणतो, लिसा आणि मला आमच्या पारंपारिक पद्धतीनुसार लग्न करण्यात इंटरेस्ट नव्हता असं नाही. पण काही गोष्टी अशा होत्या की ज्या मला आणि तिलाही पटत नव्हत्या. रूचत नव्हत्या. मग आम्ही ठरवलं की, जगभरातल्या जमेल त्या ठिकाणी तिथल्या पद्धतीनुसार लग्न करायचं. जे ठिकाणं जी पद्धत सर्वाधिक आवडेल, तिथे शेवटचं अधिकृत लग्न करायचं. आमच्या गावी डिड्सबरी मध्ये लग्न केल्यानंतर आमची भटकंती सुरू झाली.
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjEnMRSWqs4NUCuRZ8uMcKV0CDwCyDwZAOBsWqFzfV75IsO4jY59d-SiW2cYbc2t3aQmqXv95efgyhx2WyZaxAGktqJQC0XJaoikrLAGgnd2N9qAMM5KxV0SYcZnVG1vs42c0QeeL3YYt-U/s1600/7.+Hawaii+-+Julia+Bach+-+Juliabachphotography.com.jpg) |
hawaii - julia bach - juliabachphotography.com |
लिसा सांगते, आमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईंकांना आमचा हा विचार ‘क्रेझी’ वाटला. पण त्यांना समजावून सांगितल्यानंतर तेही यासाठी तयार झाले. त्यांनाही आमची कल्पना इंटरेस्टिंग वाटली. आमच्या आजवरच्या प्रवासातनं आम्हाला बरंच काही शिकायल मिळालं. प्रत्येक ठिकाणंची लग्न करण्याच्या पारंपारिक पद्धती जाणून घेता आल्या. त्या पद्धतींमागे असलेली कारणं समजावून घेता आली. लग्न हा एक असा सोहळा आहे, ज्यामध्ये जवळच्या दूरच्या नातेवाईकांपासून मित्रमैत्रिणींपर्यंत सारे केवळ आपल्या आनंदात सहभागी होण्यासाठी एकत्र येतात. खरं तर लग्न हे एक असं सामाजिक बंधन आहे ज्यावर या जगातली सारी नाती टिकलेली आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरू नये.
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj4hQt8DOrpFVIM7ZN7JQyt0LVmA30DRXhnxKxZSiGN_MDK7oHjtWLqj7qRnfDYb_8qJXBN9XSPpXfVPI6v4mNaVIFTMzczYVuLm15L_uKLkCbGIm1yyfiqjdxB-44oad1zUYs7RnvlnDnS/s1600/11.+Mexico+-+Dean+Sanderson+-deansandersonweddings.com.jpg) |
Mexico - Dean Sanderson -deansandersonweddings |
या जोडप्यानं लग्नाच्या अनेक पारंपारिक आणि वॅम्पायर वेडिंग (लॉस एंजल्स), झुलु लग्न सोहळ्यासारख्या (दक्षिण आफ्रिका) थोड्या हटके लग्न पद्धतीही अनुभवल्या. बर्याचदा तर लग्नाचं ठिकाण ठरलेलं असायचं. पण लग्नासाठी आवश्यक असलेले तिथल्या पद्धतीनुसारचे पेहराव उपलब्ध नसायचे. अशावेळी तिथल्या स्थानिक लोकांकडे तसा पेहराव असल्यास त्यांच्याकडून मागून घेऊनही, या दोघांनी लग्न केलीत. लिसाला, तिला हवा तसा पारंपारिक पेहराव मिळाला नाही तर, तिनं आपल्यासोबत घेतलेल्या लांबलचक सफेद गाऊऩवरच समाधान मानावं लागायचं. एलेक्सजवळही स्वतःचा एक सूट असतोच.
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhB9wQOMY9ycs-GUlhQUiMZaFJS5HvlNgyHnCSDPa3lPsz5Q2OAOoSJQXQu4nW0E5CwSqsLLzEb2viSqoX7mIU81a2wxxh-_9Z7utRzR0ve14qeAzV8Yt89Xi_tr9iZ0BfumKVA76_mNziK/s1600/9.+LA+-+Brothers+Wright+-+twinlenslife.com+(1).jpg) |
LA- Brothers Wright - Twinlenselife.com |
आतापर्यंतच्या लग्नसोहळ्यावरील, प्रवासावरील एकूण खर्च दोघंही उघड करत नाहीत. मात्र ते सांगतात, प्रवास व लग्नसोहळ्यावरील खर्च माफक राहील, याची आम्ही सतत काळजी घेतो. आम्ही आमच्या भटकंतीची सुरूवातच कॅनडाला जाऊन केली. कारण कॅनडाचं तिकिट इतर ठिकाणांच्या तुलनेत स्वस्त होतं. शिवाय आमच्याजवळ 25 वर्ष जुनी कॅम्पर व्हॅन आहे. या व्हॅनमध्येच आम्ही राहतो. आमच्या प्रवासात आम्हाला मदत करण्यासाठी आमच्या सोबत एक फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर आणि डान्सिंग इंस्ट्रक्टर आहे. पण आम्हाला प्रामाणिकपणे कबूल करावं लागेल की, आमचे प्रत्येक ठिकाणचे लग्न सोहळे संस्मरणीय ठरले ते तेथील प्रेमळ, मदत करण्यास तत्पर असलेल्या स्थानिकांमुळे.
जगात इतकी सुंदर ठिकाणं आहेत की प्रत्येक ठिकाण आम्हाला प्रेमात पाडतं. तिथली माणसं, संस्कृती देखील अंचबित करणारी. आता तर लिसा आणि एलेक्सची ही भटकंती अनेकांपर्यंत पोहचलीय. ज्या मंडळींना त्यांचा हा प्रयत्न अफलातून वाटतो, ती लिसा आणि एलेक्सशी इमेलद्वारे संपर्क साधतात. या दोघांना त्यांच्याकडे त्यांच्याकडची ठिकाणं, लग्न पद्धती अनुभवण्यासाठी बोलावतात.
- आतापर्यंत झालेल्या सोहळ्यांपैकी लिसा आणि एलेक्सला सर्वाधिक आवडलेली ठिकाणं म्हणजे पेरू आणि कराची. लिसा म्हणते, पेरू मधील कुस्कोजवळ असलेल्या सेकर्ड व्हॅली (पवित्र दरी) मध्ये झालेला लग्न सोहळा अद्वितीयच. बर्फाच्छादित शिखरांमधील ही पवित्र दरी अतिशय सुंदर आहे. या दरीला लागून ईंकाच्या साम्राज्याचे अवशेष दिसतात. आजूबाजूला संगमरवरी डोंगरांचे सुळके. जणू आम्ही इंकाच्या साम्राज्याचाच एक भाग होतो.
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj78Y0FMk9a5p_bSIERXsjNx1z9vYCjWGXuIJcGwz39bjdoJq8Gv_Eil3DE1MuGFXS098QfWJp-X7-ip1uPdPpDpQU-RTZtgZSd4nWQhSG4gLx3SV_TD38Xp9Tn1rWoNkkEJg5NF3qN4eRe/s1600/66.+Pakistan+-Karachi+-+oshootphotography.jpg) |
Pakistan Karachi- oshootphotography |
- पाकिस्तानात कराचीमधलं लग्नदेखील तितकंच अविस्मरणीय. एलेक्स म्हणतो, कराचीतल्या आयप्लान इव्हेण्ट्सने या सोहळ्याची जबाबदारी घेतली होती. मला शेरवानी देण्यात आली होती. माझ्या सोबत असलेल्या मुलांनी मला लगेचच तयार केलं. लिसानं मात्र तयार व्हायला ५ तास घेतले. लग्नासाठी एक घर भाड्यानं घेतलं होतं. विविध प्रकारच्या फुलांनी ते सजवलं होतं. सर्वत्र अत्तराचा सुगंध दरवळत होता. पारंपारिक पद्धतीचं संगीत लावण्यात आलं होतं. मुलं-मुली सगळे आनंदानं नाचत होते. सगळं इतकं परफेक्ट होतं की नाव ठेवायलाही जागा नव्हती.
- आमचा हा प्रवास आम्हाला थोडा खर्चिक वाटत असला तरी कंटाळवाणा मुळीच नाही. आम्ही या प्रवासासाठी आमचं इंग्लंडमधील घरं आणि मालमत्ताही विकून टाकलीय. आम्हाला आमची ही भटकंती खूपच भावलीय. आजही आमचं एकमेकांवर तितकंच प्रेम आहे. खरं तर या प्रवासामुळे आम्ही एकमेकांना नव्याने ओळखू लागलोय. आम्ही एकमेकांबद्दल पूर्वी इतकेच कमिटेड नसतो तर आता हा प्रवास अर्ध्यावरच संपला असता, लिसा आणि एलेक्स नमूद करतात.
- आणखी वर्षभर तरी लिसा आणि एलेक्सचा प्रवास सुरू राहणार आहे. सध्या हे जोडपं आस्ट्रेलियात आहे. त्यानंतर इंडोनेशिया, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, कंबोडिया. व्हिएतनाम, लाओस, चीन, जपान, मंगोलिया, कोरिया, नेपाळ येथेही ते भेट देणार आहेत. त्यांच्या प्रवासाचा शेवट ते भारतात करणार आहेत. भारतातील लग्न सोहळ्यांबाबतही या जोडप्याला फार उत्सुकता आहे. त्यानंतर आपल्या आवडत्या ठिकाणी पुन्हा एकदा ते अधिकृत लग्न करतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा