- रोचक म्हणावं असं कुतूहल नाही. नवीन ओळखीपाळखींचा आग्रह नाही. हौस असते ती घराबाहेर पडून मजा करण्याची. याचं कारण आत्ता कुठे खिशात पैसे खुळखुळायला लागलेला भारतीय पर्यटक अजून भटक्यांच्या जगातल्या साहसांना सरावलेला नाही. अंथरूण पाहून पाय
पसरण्याची शिकवण नसलेल्या पश्चिमी देशांमध्ये पोटाला चिमटे देऊन भटकंतीसाठी जग धुंडाळण्याची रीत जुनी आहे. त्यामुळे पंचतारांकित पर्यटन परवडणार्या पैसेवाल्यांबरोबरच एकेक डॉलर/पौंडाचा हिशेब करत भटकणारी मंडळीही संख्येने भरपूर असतात आणि पर्यटनाच्या क्षेत्रात कमीत कमी पैशात जास्तीत जास्त थरार अनुभवण्याचे मार्ग शोधणार्या नवनव्या क्लृप्त्या लढवण्यात त्यांचा हात धरणं कठीण! या गर्दीत आता भारतीय पर्यटकही दिसू लागले आहेत. त्या-त्या ठिकाणची संस्कृती, भाषा, माणसं, चालीरिती, खाद्यपदार्थ अशा प्रत्येक गोष्टीचा अत्यंत जवळून अनुभव घेण्याची ऊर्मी त्यांच्यात असते.
- या उत्साहामुळे जागतिक पर्यटन व्यवसायात दिवसेंदिवस नवनवीन शक्यता तयार होऊ लागल्या आहेत. ट्रेंड रुजू लागले आहेत. त्यातलेच हे तीन : पॉस्टेल, पीअर टू पीअर आणि ‘ब्रॅगी’.
पोटाला चिमटा घेऊन देश-विदेशात फिरण्याची हौस असलेल्या भटक्यांनी शोधले स्वस्तातल्या मौजमजेचे मस्त पर्याय - युरोपातले नवे ट्रेण्ड्स
पॉस्टेल
हॉटेल, पण महागडं नाही; होस्टेल,पण चिरकुट नाही !
बाहेरगावी भटकायला गेलं की हॉटेलातलं राहणं हा सर्वात महत्त्वाचा आणि खर्चाचा मुद्दा असतो. आपल्याला सुविधा तर सगळ्याच हव्या असतात, पण त्या पुरवणार्या हॉटेलांचं दरपत्रक धडकी भरवत असतं. मग कधी मन मारून, जेमतेम दर्जाच्या हॉटेलात मुक्काम पडतो, तर कधी खिशाला कात्री लावून राहण्याची मनाजोगती व्यवस्था स्वीकारावी लागते. पण अलीकडेच ब्रिटनमध्ये एक नवा ट्रेंड सुरू झालाय. तो म्हणजे पॉस्टेल. पॉस्टेल हा हॉटेल आणि होस्टेलच्या मधला प्रकार. हॉटेलमध्ये जशा चांगल्या दर्जाच्या सुविधा असतात, तशा सुविधा पुरवणारी होस्टेल्स निर्माण करायची. एखादं रेस्टॉरंट सुरू करायचं किंवा जवळच्या एखाद्या रेस्टॉरंटशी होस्टेल कनेक्ट करायचं की झालं पॉस्टेल तयार! ब्रिटनमध्ये अशी पॉस्टेल्स आता अधिकाधिक संख्येने तयार होत आहेत. तेथे तुम्हाला वायफायसारख्या सुविधा मिळतात. ट्विन सुट रूम्स मिळतात. नाश्ताही पुरवला जातो. या व्यवस्थेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मोठय़ा हॉटेलात न जाता कमी खर्चाच्या होस्टेलमध्ये सोय होते.
पर्यटनाचा खर्च कमी करणारी ही पॉस्टेल्स ब्रिटनमध्ये इतकी लोकिप्रय होत आहेत की २0१८ पर्यंत त्यांची उलाढाल २१६ दशलक्ष डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केट आणि युरोमॉनिटर यांच्या अहवालातून व्यक्त झाला आहे.
पीअर टू पीअर
जिथे जाल, त्यांच्यात राहा आणि तिथलंच खा!!‘अतिथी हा देव असतो’ याच संकल्पनेने युरोपातील पर्यटनाला एक नवीन ट्रेंड मिळवून दिला आहे. पर्यटकांना त्या-त्या पर्यटनस्थळावरील स्थानिकांच्या घरातलं जेवण चाखण्याची संधी देणारा पीअर टू पीअर व्यवसाय आता तेथे तेजीत सुरू आहे.
इटविथ डॉट कॉम या युरोपीय कंपनीने इस्त्नायल, स्पेनमधील काही शहरांत ही सुविधा सुरू केली आणि अवघ्या दोन वर्षांत एकवीसहून अधिक शहरं त्यांच्याशी जोडली गेली. काही कंपन्या स्थानिकांच्या घरातच पर्यटकांची राहण्याची सोय करतात. अशा सुविधांमुळे पर्यटकांचे पैसे वाचतातच, पण स्थानिक संस्कृतीशी, तेथील माणसांशी, खानपानाशी आयुष्यभराचे बंध जुळले जातात. त्यामुळे केवळ पैसे वाचवण्यासाठीच नव्हे, तर आपण जिथे जाऊ त्या देशाबद्दल, ठिकाणाबद्दल अत्यंत जवळून जाणून घेण्यासाठीही पर्यटक पीअर टू पीअर सुविधेला अधिक पसंती देताना दिसत आहेत.
‘ब्रॅगी’
फोटो ‘दाखवल्या’बद्दल डिस्काउंट!देश-विदेशात जाताना एखाद्या ठिकाणचे हॉटेल निवडायचे म्हटले तर आपण अनेक मार्गाने चौकशी करतो. त्यातून कधीकधी दिशाभूल करणारी माहिती मिळण्याचाही धोका असतो. मात्र परदेशात आता रुळू लागलेला ‘ब्रॅगी’ नावाचा नवा ट्रेंड हा धोकाच मिटवून टाकतो. एखाद्या हॉटेलमध्ये किंवा होस्टेलमध्ये राहणारे पर्यटकच तेथील व्यवस्थेबाबत अनुभव, छायाचित्रे इतरांशी शेअर करतात. मग यात हॉटेलच्या रूममधील बेड, तेथील स्वच्छता, रूमच्या आसपासचा परिसर, तेथून जवळची ठिकाणे अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. ही छायाचित्रे किंवा अनुभव हॉटेलचालक सोशल मीडियावरून किंवा आपल्या वेबसाइटवरून सर्वत्र पोहोचवतो. आता हे एवढे फोटो काढून ते अपलोड करण्याचा पर्यटकांना काय फायदा? तर सोशल मीडियावर हॉटेलबाबतची छायाचित्ने पोस्ट करणार्या पर्यटकांना काही सवलती पुरवल्या जातात. म्हणजे पर्यटकांचा फायदा, शिवाय हॉटेलचीही जाहिरात !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा