वीकेंडला जोडून सुट्ट्या आल्या
की सहसा कोणाचेच पाय घऱात थांबत नाहीत. त्यामुळे अशा सुट्ट्या म्हणजे ग्रुप, एकट्याने
किंवा कुटुंबासोबत फिरणार्यांसाठीही पर्वणीच. अनेकदा अशा सुट्ट्यांचा अगोदरच अंदाज
घेऊन जवळपासच्या ठिकाणांची सैर केली जाते. खरं तर हा ट्रेंड पूर्वीपासूनचा. पण आता
तोही बदलतोय. देशातली पर्यटन स्थळं सोडून देशाजवळील ठिकाणांची सैर करण्याचा ट्रेंड
आता वाढतोय. विशेष म्हणजे ट्रॅव्हलिंग कंपन्याही आता चार ते पाच दिवसांचा वीकेंड हेरून
‘शॉर्ट हॉल पॅकेजेस’ देऊ लागल्या आहेत.
पूर्वी सलग एकामागोमाग एक
सुट्ट्या आल्या की फिरण्यासाठी जवळपासची ठिकाणं शोधली जायची. ही जवळपासची ठिकाणं अगदी
हाकेच्या अंतरावरची. बसने वा ट्रेनने दोन ते तीन तासांवर असलेली. पण ती छोटी सहलही
वर्षभरासाठी पुरेशी व्हायची. मात्र गेल्या काही वर्षांमधला वीकेंड हा टिपीकल वीकेंड
राहिलेला नाही. या वीकेंडला जोडून सुट्ट्या येऊ लागल्या आणि या सुट्ट्यांमध्ये देशांतर्गत
पर्यटनाची क्रेझ वाढली. प्लेनने दीड ते दोन तासांच्या अंतरावर वा बस, कॅबने सहा ते
सात तासांवर असलेल्या ठिकाणांची सैर केली जाऊ लागली. त्यासाठी गोवा, केरळ, राजस्थान,
हैद्राबाद ही हॉट डेस्टिनेशन्स म्हणून ओळखली जायची.
आता तर अशा सुट्ट्यांमध्ये
देशांतर्गत नाही तर शेजारील देशांची सैर करण्याचा ट्रेंड वाढू लागलाय. प्लेनने केवळ
तीन ते सहा तासांवर असलेली ठिकाणं या पर्य़टनासाठी निवडली जाताहेत. त्यामध्ये अबुधाबी,
ओमेन, दुबई, थायलंड यासारख्या ठिकाणांचा समावेश आहे. येत्या काही वर्षांत हा ट्रेंड
चांगलाच रूळण्याची चिन्हे आहेत. याची चार कारणं देता येतील. एक तर वाढता उत्पन्न स्त्रोत.
दुसरे बदलती लाईफस्टाईल. तिसरं परदेशी पर्यटनाविषयीची वाढती क्रेझ. चौथं म्हणजे, ट्रॅव्हलिंग
कंपन्यांमार्फत दिली जाणारी मध्यमवर्गीयांच्या आवाक्यातली बजेट टूर पॅकेजेस.
शिवाय उत्पन्न स्त्रोत वाढल्याने
एका व्यक्तिमागे एक ते दीड लाख रुपये खर्च करण्याची तयारी पर्यटक दाखवत असल्याचे युरोमॉनिटर
इंटरनॅशनल सर्वेक्षणाचे म्हणणे आहे. शेजारील
देशांबरोबरची मैत्री अधिक दृढ व्हावी. तिथली जीवनशैली, संस्कृती परिचयाची व्हावी याकरता
एशियन टूरिझम बोर्डही अशा पर्यटनाला प्रोत्साहन देतंय. शॉर्ट हॉलबरोबरच ‘लाँग हॉल’ टूरही सुरू झाल्या आहेत.
वर्षातून एखादा महिना सुट्टी टाकून भटकंतीला निघायचं. मात्र ‘लाँग हॉल’च्या तुलनेत ‘शॉर्ट हॉल’ टूरचाच बोलबाला वाढणार असल्याची
चिन्हे आहेत. कारण ही टूर मध्यमवर्गीयांसाठीही परवडेबल ठरत असल्याचं ट्रॅव्हलिंग कंपन्यांचं
म्हणणं आहे.
यंदाचे लाँग वीकेंड
मोठ्या वीकेंडची संधी साधून परदेशांत फिरायला जायचं
म्हणजे त्याचं पूर्व
नियोजन हवंच. पण प्रत्येकालाच हे शक्य होत नाही. परदेशातील
दौऱ्याचा खर्च करून अवघ्या तीन-चार दिवसात घरी येणं म्हणजे जेवायच्या पंक्तीला जाऊन केवळ ताक पिऊन आल्यासारखं.
असं झटपट पर्यटन परवडणारंही नसत. पण तरीही या वर्षातल्या मोठ्या वीकेंडला
संस्मरणीय बनवायची तुमची इच्छा असेल तर काही देशांतर्गत ठिकाणे आहेतच. शिवाय या सुट्ट्यांच्या
काळात परदेशात जायचंच झालं तर काही ठिकाणी त्या काळात विशेष काय असेल, याची ही नोंद :
- ६मार्च, शुक्रवार – होळी , ७ मार्च शनिवार, ८ मार्च रविवार
कुठे जाऊ शकाल : शांतीनिकेतनमधील बसंत उत्सव, कुर्ग: कौफिची पांढरी फुले उमलताना पाहण्यासाठी. मसुरीचा आल्हाददायक उन्हाळा अनुभवण्यासाठी.
- २ एप्रिल – महावीर जयंती, ३ एप्रिल – गुड फ्रायडे, ४ एप्रिल – शनिवार, ५ एप्रिल – रविवार
कुठे जाऊ शकाल : व्याघ्र दर्शन घडण्याचा
अतिशय योग्य काल. त्यामुळे जिम कॉर्बेट, रणथंबोर
किंवा बांदिपुरच्या राष्ट्रीय
उद्यानांना भेट देऊन वाघ पाहता येतील.
- ११ एप्रिल – शनिवार, १२ एप्रिल – रविवार, १४ एप्रिल – आंबेडकर जयंती.
कुठे जाऊ शकाल : इस्तंबूलमधील आल्हाददायक
वातावरण पाहण्याची योग्य संधी. कारण या काळात तिथे पर्यटकांची संख्या मर्यादित असते.
अन्यथा उन्हाची लाही थांबवणारी दार्जीलिंगची देशांतर्गत
सफर आहेच.
- १ मे – शुक्रवार महाराष्ट्र दिन, २ मे- शनिवार, ३ मे – रविवार, ४ मे – बुद्ध पौर्णिमा.
कुठे जाऊ शकाल – उन्हाळ्याच्या सुट्टीत
मुलांना घेऊन क्वालालाम्पूरला (मलेशिया)
जगातील सर्वात मोठा बर्ड पार्क पाहता येईल.
इथे २१ एकरच्या पार्कमध्ये ३ हजारहून
अधिक पक्षी आढळतात. शिवाय इथे जवळच एक मोठ्ठं मत्स्यालयही आहे. जर देशाबाहेर जाणं जमणार नसेल तर सिक्कीममधील
गंगटोक शहराला भेट द्या. ईशान्य
भारताची सैर होईलच पण या काळात तेथे होणारा आंतरराष्ट्रीय फ्लॉवर फेस्टिवलदेखील पाहता
येईल.
- - १५ ऑगस्ट – शनिवार, स्वातंत्र्य दिन , १६ ऑगस्ट- रविवार, १८ – पतेती.
कुठे जाऊ शकाल: सेशेल्समध्ये (हिंदी महासागारातील
बेटसमूह) जाऊन पाण्याखालचं जग पाहण्याची
सुवर्णसंधी. विशेष म्हणजे आता तर मुंबईहून सेशेल्स अशी थेट विमान सेवाच सुरु झाली आहे. येथील व्हीसाबाबतचे नियमही शिथिल आहेत.
ते नको असेल तर केरळच्या कोवलम बीचवर आयुर्वेद थेरपी घेण्यासाठी जाण्याचा हा योग्य
काल आहे.
- १७ सप्टेंबर- गणेश चतुर्थी, १९ सप्टेंबर – शनिवार, २० सप्टेंबर – रविवार.
कुठे जाऊ शकाल : कासवांची वसतिस्थाने पाहण्यासाठी
ओमान, भूतानला ट्रेकिंगसाठी किंवा लंडनमध्ये होनार्या ‘ओपन हाउस लंडन’मध्ये सहभागी
होण्यासाठी. या उत्सवानिमित्त १९-२० सप्टेंबरला लंडनमधील ७००
ऐतिहासिक वारसा असलेली स्थळं विनाशुल्क
पाहण्यासाठी खुली केली जातात.
- २४ सप्टेंबर,
गुरुवार – बकरी ईद, २६ सप्टेंबर – शनिवार, २७ सप्टेंबर – रविवार.
कुठे जाऊ शकाल : म्युनिक्मधील आक्टोबरफेस्ट (१९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर).
- २ ऑक्टोबर – गांधी जयंती, ३ ऑक्टोबर- शनिवार, ४ ऑक्टोबर – रविवार.
कुठे जाऊ शकाल: फेसाळलेल्या पाण्यात राफ्टींग
करण्यासाठी हृषीकेशमध्ये किंवा पॅराग्लायडिंगसाठी कामशेतला.
- २२ ऑक्टोबर- दसरा, २४ ऑक्टोबर- शनिवार , २५ ऑक्टोबर – रविवार
कुठे जाऊ शकाल - म्हैसूरचा
दसरा महोत्सव, तारकर्लीचं स्कुबा
डायव्हिंग आणि डॉल्फिन दर्शन
- २४ डिसेंबर- रमझान ईद, २५ डिसेंबर – नाताळ, २६ डिसेंबर - शनिवार, २७ डिसेंबर- रविवार
कुठे जाऊ शकाल : ख्रिसमस सेलिब्रेशन
पाहण्यासाठी हाँगकाँग जबरदस्त ठिकाण आहे.
Khup Chaan... Nakkich plan karun sutti enjoy karta yeil.. Thank you...
उत्तर द्याहटवा