रविवार, ८ मार्च, २०१५

साद...

सरळसोट पर्वत, घनदाट जंगल आणि अंगावर घेऊ पाहणारा दर्‍याखोर्‍यांतला रोंरावता वारा. नजर पोहोचेल तिथपर्यंत चमकत्या सोन्यासारखा बर्फ, समुद्रकिनार्‍यांवरची घनगंभीर गाज,
हिमालयातलं शीतवाळवंट आणि घडीचा पर्वत. असलं काही कधी पाहिलंय, अनुभवलंय?आजकाल वेळ आणि सवड असली की सगळेच जण घराबाहेर पडतात. बर्‍याचदा ही सहल कौटुंबिकही असते. पण पर्यटनासाठी बाहेर पडताना कोणत्या स्थळांना अधिक पसंती मिळते?
ऐतिहासिक स्थळं, कृषी पर्यटन, वैद्यकीय पर्यटन, परदेश पर्यटन. असे अनेकविध प्रकार असले तरी आजकाल बहुतेक पर्यटकांची पसंती असते ती इको टुरिझम-निसर्ग पर्यटनाकडे. जगभरातच हा ट्रेंड वाढतो आहे. अर्थातच भारतही त्यात मागे नाही.

इको टुरिझमचा ट्रेंड भारतात नव्याने रुजू लागला  आहे. आजच्या घडीला तब्बल ४0 ते ६0 टक्के पर्यटक निसर्ग पर्यटनाच्या वाटेवर भ्रमंती करताना दिसतात. आकड्यांच्या हिशेबात सांगायचं तर ही संख्या ६0 कोटींच्या आसपास आहे.

भारतीय पर्यटकांना तर इको टुरिझमचा लळा लागलाच आहे, पण परदेशी पर्यटकही बर्‍याचदा पसंती देतात ते भारतासारख्या देशांना! भारतातलं निसर्गलावण्य, अफाट निसर्गसंपन्नता आणि देहमनाला वेड लावणारी स्थळं. हेच याचं कारण!

या अनुकूल परिस्थितीचा लाभ करून घेताना केंद्र सरकारनंही परदेशी पर्यटकांसाठी पायघड्या घालण्याचं ठरवलं आहे. नैसर्गिक सौंदर्यानं जी स्थळं ठासून भरलेली आहेत, पण आजवर जी दुर्लक्षित राहिलेली अशा पर्यटनस्थळांचं सौंदर्य आणि तिथल्या सोयी-सुविधा अधिक वर्धिष्णू कशा होतील यासाठी केंद्र सरकार पुढे सरसावलं आहे. देशातील अशा पर्यटनस्थळांना देशाच्या आणि जगाच्याही नकाशावर आणायला सरकारनंही सुरुवात केली आहे.

हिमालयातील बर्फाच्छादित शिखरं असो वा केरळची वयनाड वाईल्डलाइफ सँक्च्युरी. निसर्गसौंदर्यासोबतच तिथल्या मुक्त वन्यजीवनाचंही डोळे भरून दर्शन घडलं तर पर्यटक त्यासाठी जिवाचं रान करतात. त्याचा चांगला परिणाम आता दिसू लागला आहे.

इको टुरिझममुळे अनेक अपरिचित ठिकाणं आता प्रसिद्धीच्या झोतात येताहेत. लोकांची कधीच न वळलेली पावलं आता जाणीवपूर्वक आपली वाट वाकडी करू लागली आहेत. तिथल्या स्वच्छंद निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेताना स्वत:लाही साचेबंद जोखडातून मुक्त करू पाहताहेत. त्याच हटके पाऊलवाटांची ही सहल आपल्यालाही समृद्ध करून जाईल.

भारताचं स्कॉटलंड!


दक्षिण भारतातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेलं कुर्ग (कर्नाटक) समुद्रसपाटीपासून १५२५ मीटर उंचीवर आहे. आकाशाकडे झेपावणारे सरळसोट पर्वत, धुक्यात हरवून गेलेल्या टेकड्या, घनदाट जंगलं, संत्र्याच्या बागा आणि अंगावर रोमांच उभं करणार्‍या दर्‍याखोर्‍या. यामुळे कुर्गला ‘भारताचं स्कॉटलंड’ म्हणून ओळखलं जातं. इथल्या नागरहोळ अभयारण्यात हत्ती, वाघ, चित्ते, हरीण यांसारखे प्राणी पाहायला मिळतात. जंगल सफारीतून निसर्गाची विविध रूपं अनुभवता येतात. कावेरी नदीचं उगमस्थानही इथलंच! त्यामुळे इथला रिव्हर राफ्टींगसारखा अँडव्हेंचरस अनुभवही विरळाच! 

द अबोड ऑफ स्नो!


जिकडे पाहावं तिकडे चमकत्या सोन्यासारखा बर्फ! अशा ठिकाणी माणूस देहभान हरपतोच! ‘द अबोड ऑफ स्नो’ म्हणून परिचित असलेल्या हिमालयात विविध प्रकारचं वन्यजीवन पाहायला मिळतं. अनेक प्रकारच्या वनौषधीही येथे आहेत. हिमालयाच्या पायथ्याशी सागवान, शिसमची जंगलं, चीर, ओक, देवदारची डेरेदार झाडं पाहायला मिळतात. त्याशिवाय प्राणी-पक्ष्यांच्या दुर्मीळ प्रजातीही येथे भरपूर. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान (उत्तराखंड), द ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क (हिमाचल प्रदेश), नामदाफ नॅशनल पार्क (अरुणाचल प्रदेश, देशातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान), रॉयल चितवान पार्क (नेपाळ) या राष्ट्रीय उद्यानांतील भ्रमंती म्हणजे डोळ्यांची अक्षरश: चंगळ!

किनार्‍यांवरची गाज


गोव्याच्या समुद्रकिनार्‍यांनी वेड लावलं नाही असा पर्यटक सापडणं मुश्कील!  सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या गोव्यात जैवविविधताही मोठय़ा प्रमाणावर पाहायला मिळते. इथलं भगवान महावीर अभयारण्य, बोंडला अभयारण्य, खोतीगाव अभयारण्य, सालीम अली पक्षी अभयारण्य. यांसारखी स्थळं म्हणजे निसर्गप्रेमींसाठी हक्काचं ठिकाण. गोव्यातील २0 टक्के भूभाग वन्यजीव संवर्धन क्षेत्रांतर्गत मोडतो. 
याच क्षेत्रातील सांगुएम आणि सत्तारी येथे विहार करणार्‍या पक्ष्यांच्या शेकडो 
प्रजाती आणि वन्यजीव डोळ्यांचे पारणे फेडतात. 

सायलेण्ट व्हॅली!


निसर्गसौंदर्याने नटलेल्या केरळमधील इरावीकुलम नॅशनल पार्क, पेरिय.ार नॅशनल पार्क, सायलेण्ट व्हॅली नॅशनल पार्क आपल्या निसर्गलावण्यानं पर्यटकांना अक्षरश: मंत्रमुग्ध करतात. तामिळनाडू आणि केरळच्या सीमेवरील इरावीकुलम नॅशनल पार्क नीलगाय, तराहसाठी, तर पेरियार नॅशनल पार्क तिथल्या वाघांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. कुंडलई टेकडीवरील सायलेण्ट व्हॅली नॅशनल पार्कमध्ये औषधी आणि दुर्मीळ झाडांच्या जाती पाहायला मिळतात. याशिवाय वयनाड वाईल्ड लाईफ सँक्चुरी वाघ आणि बिबट्यांसाठी प्रसिद्ध आहे.

घडीच्या पर्वताची जादू!


काराकोरम व हिमालय पर्वतरागांमध्ये वसलेलं लडाख शीतवाळवंट म्हणून प्रसिद्ध आहे. लडाखमधलं घडीच्या पर्वतांचे भूगर्भीय नवल! निसर्गसौंदर्याची जादू काय असते ते पाहायला तिथेच जायला हवं. एप्रीकॉट व्हॅली, जांस्कर रेंज, नुब्रा घाटी, आशिया खंडातील सर्वात मोठे खार्‍या पाण्याचे नैसर्गिक तळे, शिवाय काळ्या मानेचा क्रौंच, सोनरी गरुड, दाढीवालं गिधाड, पांढर्‍या पंखांचा रेडस्टार्ट, हिमालयीन गिधाड यांसारखे पक्षी, तर स्नो लेपर्ड, कियांग, ब्लू शीप, आयबेक्स हे प्राणी आपल्याला एका वेगळ्याच विश्‍वात घेऊन जातात.