रविवार, ८ फेब्रुवारी, २०१५

द शूटिंग स्टार

हिमालयाच्या कुशीतलं डेहराडून हे छोटंसं शहर. शैव्या नाथचं बालपण इथेच गेलं. उच्च शिक्षणासाठी ती सिंगापूरला गेली. तिथेच सिंगापूर टूरिझम बोर्डमध्ये जॉब मिळाला. डिजिटल मार्केटिंग अँड सोशल मिडिया प्रोफेशनल म्हणून काम करणारी शैव्या ट्रॅवल ब्लॉग्जवर तासनतास काढू लागली. प्रसिद्ध ट्रॅवल ब्लॉगर्सना ती फॉलो करू लागली आणि तिलाही भटकंतीचे वेध लागले. ती पैसे साठवू लागली. भटकण्यासाठी.


तिच्या जॉबचाच एक भाग असल्याने सतत नवनवी ठिकाणं, तिथलं सौंदर्य, जीवनशैली तिच्या नजरेखालून जात होती. हे सगळं आपणही प्रत्यक्ष अनुभवावं, असं तिला वाटू लागलं. पण शेवटी आईवडिलांची परवानगी मिळवणं कठीण होतं. एकटी मुलगी कसा प्रवास करणार? तरीही शैव्याने प्रयत्न सुरूच ठेवले. तिने एअर एशियाच्या स्पर्धेत भाग घेतला नि चक्क फ्रान्सची दोन रिटर्न तिकीटं जिंकली. अशी तिच्या प्रवासाला सुरूवात झाल. त्यानंतर बिनपगारी सुट्टी घेऊन तिनं स्पिटीत हिमालयाच्या पर्वतरांगा पार केल्या... तिनं एकटीनं केलेला पहिला प्रवास.
त्यानंतर पुन्हा दोन महिन्यांनी जॉबवर रूजू झाल्यानंतर तिला चैन पडेना. लोकांच्या प्रवासाचं नियोजन करून देत देत आपण ऑफिसातच बसायचं? शेवटी जुलै 2011 मध्ये नोकरीला राम राम ठोकला. दिल्लीतलं अपार्टमेंट, घरातलं सामान विकून ती शब्दश: भटकी झाली आणि आपला छंद जोपासत पैसे कमावण्याचा मार्ग तिने शोधला. तिने प्रवासावरील लेख ट्रॅव्हलिंग कंपन्या, मासिकांना देण्यास सुरूवात केली. स्वतःचा ब्लॉग सुरू केला. शिवाय इंडिया अनट्रॅव्हल्ड ही सामाजिक दायित्व घेणारी ट्रॅवलिंग कंपनीही सुरू केली.
शैव्या म्हणते, एखाद्या अनोळखी प्रदेशात अनोळखी म्हणूनच फिरणं, जास्त उत्कंठावर्धक असतं. त्यामुळे एखाद्या ठिकाणाबद्दलच असलेला तोच तोचपणा वा नेमकी छापील इम्प्रेशन्स सोडून काहीतरी नवं गवसल्याचा आनंद मिळतो. तिने आजवर केलेल्या भटकंतीत गार्डा तलावाच्या (इटली) पश्चिमेला वसलेलं गारग्नानो हे छोटंसं शहर तिला खूप भावलं. ती म्हणते, इथला प्रत्येक माणूस प्रत्येक दुसर्या माणसाला ओळखतो. हे शहर मला इतकं आपलंसं वाटलं की, तिथल्या छोट्याशा वास्तव्यातही मी त्या शहराची नस न नस ओळखू लागले. गार्डाच्या बदलत्या रंगावरून मी तिथली वेळ सांगू शकते. तर तिथल्या पर्वतावर जमणार्या बर्फाच्या आच्छादनावरून मी तिथला सिझनही सांगू शकते.

असोत आव्हाने फार...

तारुण्याच्या उंबरठ्यावर, कारकीर्द बहरत असताना नोकरी सोडून, स्वतच होत नव्हते ते विकून भटकंतीचा ध्यास घेणाऱ्या शैव्याचं आयुष्य थ्रीलिंग आहे. तिची हि जिप्सी जीवनशैली पाहून आपल्यातल्या काहीना हे अचाट धाडस करायचा मोह्देखील होईल. पण शैव्याच हे साहस जितक रोमांचक आहे तितकच ते खडतरही आहे. तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी तिच्या ब्लॉगवरील जुन्या पोस्ट्स चाळताना २०१३ मधली तिची एक पोस्ट वाचनात आली. तब्बल चार महिने सलग प्रवास केल्यानंतर डिसेंबर २०१३ मध्ये लिहिलेल्या या पोस्टमध्ये तिने तिला येणाऱ्या अडचणी मांडल्या आहे. ती पोस्ट जशीच्या तशी...

हा मार्ग मला कुठे घेऊन जाईल याबद्दलच्या अमर्याद आणि अद्भुत स्वप्नांमुळे आजही माझी झोपमोड होते. स्वप्नातल्या एखाद्या क्षणी मी राजस्थानमधल्या एखाद्या खेडूतासोबत अफुमिश्रीत हुक्का ओढत बसलेली दिसते, पण पुढच्याच क्षणाला जर्मनीतल्या  एखाद्या बाजारात ख्रिसमसच्या काळात मी ग्लो वाईनचे घुटके घेताना आढळते. एखाद्या दिवशी हेरलेल्या सावजावर झडप घालण्याच्या तयारीत दबा धरून बसलेल्या वाघावर माझ्या नजरा खीळलेल्या असतात आणि अचानक मी सेशेल्समध्ये पाण्याखालची दुनिया न्याहाळताना दिसते... हे सगळे अनुभव कागदावर किंवा सांगताना किती अद्वितीय वाटतात न! पण आताही याबद्दल लिहिताना लांब पल्ल्याच्या प्रवासातल्या आणि एक महत्वाकांक्षी ट्रॅव्हल ब्लॉगर बनण्याच्या मार्गातल्या अडचणींच वास्तव माझ्या अंतर्मनात घोळत राहतं.
उदयपूरच्या गेस्ट हाऊसच्या गच्चीवर बसून हे लिहित असताना माझ्यासमोर पिछुलाचं विस्तीर्ण तळं पसरलेलं दिसतं. खरं तर या ठिकाणी येणं आणि राहणं माझ्यासाठी प्रचंड मोठं आव्हान होतं. माझ्या एका दिवसाचं बजेट दोन हजार रुपयांवर चाललं होतं. तरीही येथे माझ्या राहण्याची व्यवस्था फारशी समाधानकारक नाही आणि इथलं इंटरनेटही वेगानं काम करत नाही. मी आधी असलेल्या पाली या गावातून  येथे येण्यासाठी मला, 3 बस बदलाव्या लागल्या.सुमारे चार तास रस्त्यावरून गाडीत शिरणारी धूळ अंगावर झेलत आणि दीडशे रुपयापर्यंत पैसे मोजून मी इथे पोहचले. तिथून एखादी एसी टॅक्सी पकडून 2 हजार रुपये मोजून अडीच तासात मला पोहचता आलं असतं. पण अजूनही या दोन पर्यायांच्या मधला पर्याय मला सापडलेला नाही. भारतासारख्या देशात स्थानिक बसमधून प्रवास करणं आणि एखाद्या गल्लीबोळातल्या परवडेबल हॉटेलमध्ये राहणं, दुसर्या एखाद्या व्यक्तिला  आयुष्याचा अनुभव  वाटला असता. पण सलग चार महिने असेच दिवस काढल्यानंतर आणि युरोप किंवा अन्य विकसित देशांमधल्या माफक दरातील प्रवासाशी त्याची तुलना केल्यानंतर, माझी सध्याची भटकंती फारच खडतर असल्याचं जाणवत राहतं.
बरं हे सगळं केल्यानंतर फ्रीलान्सर म्हणून वाट्याला येणार्या अडचणींचं गुर्हाळ संपत नाही. लेखांचा मोबदला मिळण्यात होणारा अनाठायी विलंब आणि पीआर कंपन्यांबरोबर सतत सुरू असलेली पैशांबाबतची बोलणी फिरण्याच्या उत्साहाला तडा देत असतात. अगदी माफक मोबदल्यात तुमच्याकडून हवे तितके ब्लॉग पोस्ट लिहून घेणं हा जणू त्यांचा अजेंडाच असतो. हुश्श! या सगळ्यात पार दमायला होतं.

पण गेल्या वर्षभरातला, विशेषतः गेल्या चार महिन्यातल्या अफलातून भटकंतीकडे वळून पाहिल्यावर आपण तक्रार तरी का करावी, असा प्रश्न पडतो. ते सगळे दिवस अविस्मरणीय आहेत. माझ्या या नव्या जीवन पद्धतीचं कैतुक करणारे असंख्य मेल येतच असतात. पण आयुष्य विचित्र आहे. आता रोजचा सूर्य वेगवेगळ्या ठिकाणी पाहण्याच्या इच्छेपेक्षा शॉवरसाठी एखादं मस्त बाथरूम मिळावं ही इच्छा आधिक उफाळत असते. दुरून डोंगर साजरे म्हणतात ना ते हेच!