रविवार, २२ फेब्रुवारी, २०१५

सरकता स्वर्ग

जग भटकायचं, पण विमानात पाऊल ठेवायचं नाही, असा पण करून कुणी प्रवासाला बाहेर पडलं तर? - पळणार्‍या रेल्वेतून मागे सरणार्‍या दृश्यांचे देखणे नजारे सारं सार्थकी लावतील!!

मायकेल हॉडसन पेशानं वकील.  आपल्या अशिलाची बाजू मोठय़ा तडफेनं  न्यायाधीशांसमोर  मांडायचा तेव्हा भले भले तोंडात बोट घालायचे, पैसाही उत्तम मिळायचा. पण रोज उठून काय तेच ते?.  आपलं करिअर अचानक त्याला बोअरिंग वाटायला लागलं. भटकण्याची आवड त्याला पहिल्यापासून होतीच. त्यानं आणखी एक ट्रायल घेतली. मध्य अमेरिकेतील निकाराग्वा देशाला पहिल्यांदा भेट दिली. २00७ साल सरताना महिनाभर केलेल्या या ट्रीपनं त्याला एकट्यानं प्रवास करण्याचा विश्‍वास दिला. त्याचा उत्साह दुणावला पृथ्वीसारख्या ज्या सुंदर ग्रहावर आपण राहतो, त्याचं डोळे भरून किमान दर्शन तरी आपण कधी घेणार, या विचारानं त्यानं थेट पृथ्वीप्रदक्षिणाच करायचा निर्णय घेतला! २00८ मध्ये त्यानं जगभ्रमंतीला सुरुवात केली, पण एक गोष्ट त्यानं मनोमन पक्की केली होती, काहीही झालं तरी विमानानं प्रवास करायचा नाही. 



त्यामागे दोन मुख्य कारणं. एकतर ‘हवेतल्या’ प्रवासामुळे तुमचा जमिनीशी संपर्क राहात नाही. जग तुम्हाला खर्‍या अर्थानं पाहताच येत नाही आणि दुसरं. विमान हे प्रवासाचं अतिशय वाईट माध्यम असल्याचं त्याचं ठाम मत आहे. कारण, प्रदूषण. कार्बन उत्सर्जनात विमानांचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळे मायकेलनं विमानावर पहिल्यांदा काट मारली! रेल्वे, बस, टॅक्सी, बोट. अगदी मिळेल त्या सार्वजनिक वाहनानं, कधी कधी तर त्यानं पायी प्रवास केला अन् १६ महिन्यांत, ४४ देश, सहा खंड पालथे घातले. विशेष म्हणजे, या प्रवासात त्या त्या खंडाची आठवण म्हणून त्याने हातावर टॅटूही काढून घेतले. मॉस्कोहून बिजिंगला विमानानं जाणं खूपच सोयीस्कर असलं तरी इथेही त्यानं प्राधान्य दिलं ते रेल्वेलाच. ट्रान्स-मंगोलियन ट्रेननं केलेला पाच दिवसांचा प्रवास त्याच्यासाठी रोमांचकारी तर ठरलाच, पण विस्तीर्ण रशियाच्या अगाधतेची साक्षही त्याला मिळाली. आयपॉडवर गाणी ऐकत, खिडकीतून बाहेरील नजारा न्याहाळत, नोट्स लिहित प्रवास करणं म्हणजे साक्षात स्वर्गच असं त्याला वाटतं.
  मायकेलचा आजवरचा संपूर्ण प्रवास रस्ता, रेल्वे किंवा जलमार्गाचा. इतकी मुशाफिरी करताना एकदाही त्याने विमानाचा वापर केलेला नाही. हवाईप्रवास कितीही सहजसोपा आणि वेळ वाचवणारा असला, तरी मायकेलची पावलं कधी विमानतळाकडे वळली नाहीत.
कारण? - तो म्हणतो, प्रवास करायचाय ना तुम्हाला? मग जमिनीची साथ सोडू नका. पाहा किती वेगळी अनुभूती येते! आणि जग किती वेगळं दिसतं!

खिशात दमडी नाही, पण जगप्रदक्षिणेची धमक!

भटक्याचं आयुष्य जगत असताना सर्वात मोठं आव्हान असतं ते अर्थातच पैशाच्या जमवाजमवीचं. साठवून साठवूनही कितीक पैसे साठवणार? आणि गाठीशी असतील, ते कसे, कुठे पुरवणार? मायकेलने साठवलेले पैसे पहिल्या काही महिन्यातच फुर्र्र झाले. मध्य अमेरिका, दक्षिण पूर्व आशियाईतील देशांमध्ये त्याला महिन्याला साधारण हजार डॉलर खर्च आला, तर उत्तर अमेरिका, युरोपसारख्या तुलनेने महागड्या ठिकाणी महिन्याला तीनेक हजार डॉलर्स लागले. मग मात्र मायकेलने आजकालचा लोकप्रिय मार्ग निवडला : प्रवासाचा ब्लॉग लिहायचा आणि त्यासाठी पर्यटन उद्योगातले प्रायोजक शोधून त्यातून आपल्या पुढच्या भटकंतीची व्यवस्था करायची.
- असे मिळणारे पैसे अर्थातच अपुरे असतात. पण मायकेल म्हणतो, एकदा घराबाहेर पडलं आणि विमानात पाऊल ठेवायचं नाही असं ठरवलं की लागतात कितीसे पैसे?

‘एक क्षणही कुणाला देणार नाही..!’



सप्टेंबर महिन्यात लिस्बन ते सायगाव (व्हिएतनाम) हा १५ हजार मैलांचा रेल्वेने केलेला प्रवास मायकेलचा आजवरचा सर्वात आवडता प्रवास आहे. या प्रवासातल्या सगळ्याच आठवणी त्यानं जतन करून ठेवल्या आहेत. मायकेल सांगतो, ‘या प्रवासानं माझं तनमनच पूर्णत: स्वच्छ झालंय. उद्या कुणी या प्रवासातला एखादा क्षण जरी माझ्याकडे मागितला तरीही मी तो कुणालाच देणार नाही. असे क्षण ज्याचे त्यालाच कमवावे लागतात.’ ‘बस किंवा रेल्वेच्या खिडकीतून मागे पडत चाललेलं जग पाहण्याइतकं वेड मला आणखी कशाचंच नाही,’ असं नमूद करताना मायकेल सांगतो, ‘अख्ख्या आयुष्यभर मी प्रवास करू शकतो. नवीन ठिकाणं पाहणं, जुन्या ठिकाणांचा नव्या दृष्टीनं अनुभव घेणं, वाटेत मित्र बनवत बनवत पुढल्या आयुष्यभरासाठी त्यांना जोडून घेणं. या सार्‍या गोष्टींनी आता माझा पुरता कब्जाच घेतला आहे. आनंद मिळवणं हेच आयुष्याचं ध्येय असतं ना? - हाच माझा आनंद आहे!’

‘हकुना मटाटा’





mount kilimanjaro summit uhuru peakआफ्रिका खंडातील किलीमांजारो या पर्वतावरील चढाई. टांझानियातील केनियाच्या सीमेवर असलेला हा पर्वत १९ हजार ३४१ फूट उंच आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकानं तयार झालेला हा जगातील सर्वात उंच पर्वत! २00९ मध्ये मायकेलने तिथला स्थानिक गाइड इयानच्या मदतीनं या पर्वतावर चढाई केली. मायकेल म्हणतो, इयानने तब्बल दोनशेपेक्षा जास्त वेळा या पर्वताचं शिखर गाठलंय. चढाईची तयारी करत असताना आणि प्रत्यक्ष चढाई सुरू असतानाही तो मला सतत सांगत असायचा. ‘हकुना मटाटा’. म्हणजे काळजी करू नकोस. पण पर्वताची उंची पोटात गोळा आणणारी, छातीत धडकी भरवणारी. किली सर करणं कठीण नसलं, तरी जसजसं वर जाऊ लागलो तसतसं मला ‘अल्टिट्यूड सिकनेस’ जाणवू लागला. किबावरून चढाई करताना हा सिकनेस मला जाणवत नव्हता. पण ‘नो एक्सक्युजेस, नो टर्निंग बॅक’. mount kilimanjaro tattoo hakuna matata

‘हकुना मटाटा’ म्हणून स्वाहिली भाषेतनं धीर देताना इयान फक्त एवढंच सांगायचा. परतीचे सारे मार्ग कापले गेले आहेत. चालत राहा. सावकाश. आपण नक्कीच पोहोचू.  थोडंसं नाराजीनं, पण मीही त्याला ‘हकुना मटाटा’ म्हणून प्रत्युत्तर द्यायचो. पण ते शिखर सर केलं आणि मला स्वर्ग खरोखरच दोन बोटं राहिला! माझ्या आयुष्यातला तो अविस्मरणीय क्षण आहे! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा